Tathagat Vidhyalay-Karbhand
नांदेड

प्रजासत्ताक दिननिमित्त जिल्हा परिषद शाळा गोर्लेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

प्रजासत्ताक दिननिमित्त जिल्हा परिषद शाळा गोर्लेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

हदगाव/गोर्लेगाव: (नांदेड): २६ जानेवारी १९५० रोजी भारताची जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आमलात आली. लोकशाहीचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने त्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशांमध्ये विविध ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ७४व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोर्लेगाव येथे दिनांक ३१-जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस नवनिर्वाचित सरपंचा सौ. अनिता तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व शिक्षक वृंद यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रतिष्ठित व सन्माननीय व्यक्ती यांचा सत्कार करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यास मदत होत असते.

नृत्याच्या माध्यमातून आपल्या अंगातील कला आणि नाटके व भाषणांच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळते.

श्री गणेशाच्या नृत्याच्या माध्यमातून श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाच्या पहिल्या पर्व सुरुवात करण्यात आली. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालगीतांवर हटके-ठुमके देत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हुंडाबळीच्या नाटकाच्या माध्यमातून समाजातील एक वास्तव सत्य प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचे महत्त्वाचे काम केले. मोबाईलचा मानवी जीवनात होत असलेला अतिरेक, त्याचा वाढता वापर व त्यामुळे होत असलेले दुष्परिणाम एका मूकपटा च्या माध्यमातून समाजाला दाखवण्याचे काम गोरलेगाव येथील शाळेतील  विद्यार्थ्यांनी केले आहे. हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई व सर्व धर्मांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या नाटकाच्या माध्यमातून सर्व धर्मातील व्यक्तींनी एकमेकांच्या धर्माच्या प्रति आदर बाळगावा व आपल्या देशातील विविधतेतील एकता जोपासण्याचे आवाहन विद्यार्थ्यां तर्फे करण्यात आले.

नृत्य व नाटकाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे असणारी, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून नोकरी करणारी, समाजकार्यात सहभाग घेणारी, शिक्षण घेऊन सक्षम होत असलेली आजच्या युगातील स्त्री प्रेक्षकांसमोर मांडण्याचे काम केले आहे.

संपूर्ण कार्यक्रम दरम्यान चित्रपट व देशभक्ती गीतांवर उत्कृष्ट असे नृत्य सादरीकरण जिल्हा परिषद शाळा गोरलेगाव येथील विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. प्रेक्षकांकडून आज झालेल्या संस्कृती कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत पोवाडे व नृत्य यांकरिता त्यांचे कौतुक सुद्धा करण्यात आले. शेवटी समस्त ग्राम वासीयांतर्फे शाळेचे मुख्याध्यापक मनुलकर व सर्व शिक्षक वृंदांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी स्वागत व जाहीर आभार मानण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक मनुलकर सर, शेख सर, तांबरे सर, वनशेट्टे मॅडम, सर्व शिक्षक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामरावजी चव्हाण, उपसरपंच प्रभाकर पाटील, शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष व सदस्य, रामदास चव्हाण, लक्ष्मण शिंदे, पत्रकार तुकाराम चव्हाण, सुधाकर चव्हाण, देवानंद चव्हाण, बाळू गायकवाड, अब्दुल पठाण आदी सर्वांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी: तुकाराम चव्हाण,गोर्लेगाव-नांदेड

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!